दिवाळी प्रवास: खबरदार..! प्रवाशांकडून जास्त तिकीटदर आकाराल तर , एसटी तिकीट दराच्या दिडपटीपेक्षा जास्त दर नसावे; आरटीओ कार्यालयाचे लक्ष

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगरः दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी अनेकजण विविध ठिकाणी जातात. आप- आपल्या गावी जाण्याची ओढ देखील अनेकांना असते. त्यामुळे रेल्वे, एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्सला देखील गर्दी असतेच. त्यात एसटीला गर्दी असते तर दुसरीकडे रेल्वेला वेटिंगवर वेटिंग असते. अशातच खासगी ट्रॅव्हल्सचे दर पाहिले तर अनेकांना परवडणारे नसतात. काहीजण ट्रॅव्हल्सचे दर भरमसाठ वाढवितात. त्यामुळे जास्तीचे दर आकरणे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यावर आरटीओ कार्यालयाच्या वतीने लक्ष केंद्रित केले आहे. नियमांचे पालन न करता तिकीट दर जास्तीचे आकारणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्सचे दर वाढविले जाते. परंतु इतरवेळी ट्रॅव्हल्स कमी दरात प्रवाशांना घेऊन जातात. सणासुदीचा एकमेव काळ त्यांना व्यवसायासाठी उत्तम ठरतो. परंतु अशातच काही ट्रॅव्हल्सधारक नियमांचे पालन करताना आढळतात तर काहीजण काहीही दर आकारून प्रवाशांची लुटही करतात. त्यामुळे प्रवाशीवर्गाच्या खर्चात आणखी वाढ होते. मात्र असे असले तरी नियमानुसार एसटी बस नुसार तुलना केली तर एसटीचे जे ठरवून दिलेले तिकीट दर आहेत. त्यांच्या दीड पटापेक्षा जास्त खासगी ट्रॅव्हल्सचे दर नसावे. असा गव्हर्नमेंटचा नियम आहे. आणि जर त्यापेक्षा जास्त दर आकारले गेले तर कारवाई केली जाते. आरटीओकडून यंदाही दिवाळीत असे नियमबाह्य तिकीट दर आढळणाऱ्यावर कारवाई करणार आहे. एसटीचे सध्या दर जसे असेल त्याप्रमाणे ट्रॅव्हल्सचे दर दीड पटीपेक्षा जास्त नसावे. त्याप्रमाणे स्लीपर बसेससाठी देखील तेच नियम आहे. त्या नियमांचे पालन ट्रॅव्हल्स धारकांनी करायचे आहे. उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. याशिवाय दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांनी प्रवास करताना तिकीट जास्तीचे आकारले गेले तर आरटीओ कार्यालयाकडे तक्रार करावी. ही तक्रार .20-. या इमेलवर तक्रार करावी. त्याचीही दखल घेतली जाणार आहे. तत्काळ योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई : विजय काठोळे

एसटी बसेसच्या दरापेक्षा दीडपट भाडे ट्रॅव्हल्सने आकारू नये. असा नियम आहे. दीडपट म्हणजे दीड पटीपेक्षा कमीच दर आकारले जावे. याशिवाय त्यापेक्षा जर जास्त दर आकारले जात असेल तर प्रवाशीवर्गाने आरटीओ कार्यालयाकडे तक्रार करावी. योग्य ती कारवाई त्यानुसार केली जाणार आहे. बऱ्याचदा अनेकांना नियम माहीती नसतात त्यामुळे काही प्रवाशांनाही दर जास्त वाटत असतात. परंतु तरीही प्रवाशांना दर जास्त वाटत असेल तर ते तक्रार करू शकता. तक्रार केल्यानंतर कारवाई केली जाईल. दिवाळीसाठी मोहिम सुरू आहे. त्यात कोणी नियमांचे पालन करताना आढळले नाही तरी त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतनेही दिले निवेदन : भारती भांडेकर

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने खाजगी बसेस, टॅक्सी, रुग्णवाहिका इतर अनेक वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य जनतेला आर्थिक बोजा पडतो व त्यांचा प्रवास महागात जातो.  यासंदर्भात या खाजगी वाहन व्यवस्थेवर निर्बंध आणण्यासाठी दर निश्‍चिती व त्याची व्यापक प्रसिद्धी, अवाजवी भाडेवाढ संदर्भात हमीपत्र देणे, परिवहन विभागातर्फे भाडेवाढ निश्‍चित करणे, सर्वसामान्य जनतेचा विचार करून खाजगी वाहन व्यवस्थेवर किती भाडं निश्‍चित करावं या संदर्भात परिपत्रक काढावे अशी मागणीही अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने आरटीओ अधिकारी यांच्याकडे केली असल्याचे ग्राहक पंचायत महानगर अध्यक्ष भारती भांडेकर यांनी सांगितले.